RTE (आरटीई) प्रवेशासाठी १७ फेब्रुवारी पासून अर्ज भरण्यास सुरुवात
मुंबई : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत RTE (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून (१७ फेब्रुवारी २०२६) सुरू करण्यात आली आहे आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकांना मुलांचे अर्ज १० मार्चपर्यंत भरता येतील, या प्रक्रियेत ८,६५० शाळांची नोंदणी झाली असून, एक लाख १२ हजार ७०६ जागा उपलब्ध आहेत. यापैकी ९०५ शाळांतून १७ हजार ५०९ जागा RTE (आरटीई) साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
पहिली ते आठवी इयत्तांसाठी आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना RTE आरटीईच्या माध्यमातून मोफत शिक्षणाची संधी मिळणार आहे.
महत्त्वाच्या सूचना :
१) पोर्टलवर निवासस्थानानुसार १ किमी अंतरावरील शाळा दिसतील.
२) एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास कोणताही अर्ज लॉटरीत विचारात घेतला जाणार नाही.
३) पालकांना १० शाळांची निवड करावी लागेल.
४) मेसेजऐवजी पोर्टलच्या सूचनांचे पालन करावे.
५) चुकीची माहिती दिल्यास प्रवेश रद्द होईल.
६) निवासस्थान नमूद करणे बंधनकारक आहे.
अर्जासोबत कागदपत्रे अपलोड करणे सक्तीचे आहे.
अफरातफरी रोखण्यासाठी काही निर्देश दिले आहेत. यामध्ये
• आई-वडिलांचे आधार कार्ड
• बालकाचे जन्मप्रमाणपत्र
• वास्तव्याचा पुरावा (भाडेकरार नोंदणीकृत असावा)
• जाती/अपंगत्व दाखला (परराज्यातील दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही)
• उत्पन्नाचा दाखला (१ लाखापेक्षा कमी) समाविष्ट आहेत.
पालकांनी वेळेत अर्ज भरून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




