वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर भोरकरांचा उद्रेक ! महावितरण कार्यालयाला घेराव !! पत्रकार संघ, व्यापारी संघटना व नागरिकांचा सहभाग
भोर : भोर शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तासन्तास वीज नसणे आणि वाढत्या वीजबिलांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी आठवडे बाजाराच्या दिवशी महावितरणच्या सम्राट चौक येथील कार्यालयावर निषेध मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले. भोर तालुका पत्रकार संघ, व्यापारी संघटना, आजी-माजी नगरसेवक तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
भोर शहरात बेरोजगारी, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण, सांडपाणी व्यवस्था आणि विकासकामांबाबतच्या समस्यांबरोबरच वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत वारंवार वीज खंडित होण्याची कारणे, देखभाल-दुरुस्तीची कामे, अखंडित वीजपुरवठ्याची योजना आणि शहराला २४ तास वीज कधी मिळणार याबाबत जाब विचारला.
यावेळी महावितरणने लेखी निवेदन देत संबंधित विद्युत केंद्रातील ब्रेकर व रिले दुरुस्तीचे काम शनिवार, दि. २२ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येईल, तसेच वीजवाहिनीवरील ‘अँटी बर्ड फॉल्ट’ यंत्रणा बसवून पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आश्वासन दिले. शहरातील वीजवाहिनी भूमिगत करण्याचा तसेच नवीन आरएमयू (Ring Main Unit) उभारण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविल्याची माहितीही देण्यात आली.
महावितरणकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र भविष्यातही वीजपुरवठ्याच्या समस्या कायम राहिल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी पत्रकार, छायाचित्रकार, व्यापारी, लोकप्रतिनिधी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




