ताज्या घडामोडी

शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीला सलाम ! माजी सैनिकांनी जागवल्या कारगिलच्या आठवणी


भोर : कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिक विकास व सेवा संस्था, भोर-राजगड संघटनेच्या वतीने शहीद जवानांना मानवंदना अर्पण करून त्यांच्या अद्वितीय शौर्याला सलाम करण्यात आला. देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृतींना अभिवादन करत उपस्थित माजी सैनिकांनी राष्ट्रसेवेचा संकल्प दृढ केला.

संघटनेचे अध्यक्ष सार्जंट कृष्णा टापरे, सचिव ऑनररी सुभेदार मेजर मोहन बाळू उभे तसेच उपाध्यक्ष हवालदार हनुमंत बांदल हे पंढरपूर वारी सोहळ्यात सहभागी असल्याने कार्यक्रमाची जबाबदारी कोषाध्यक्ष हवालदार भगवान मालुसरे आणि सहकोषाध्यक्ष ऑनररी सुभेदार मेजर सुनील राऊत यांनी यशस्वीपणे सांभाळली.

Advertisement

यावेळी कारगिल युद्धातील शौर्यगाथांचे स्मरण करण्यात आले. कारगिलच्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्याने दाखविलेल्या पराक्रमाचा गौरव उपस्थितांनी केला. शहीद जवानांच्या बलिदानामुळेच देशाची अखंडता आणि सार्वभौमत्व सुरक्षित असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमात नायब सुभेदार निवृत्ती म्हस्के, हवालदार पोपट पिसे, हवालदार दिलीप आंबवले आणि नायक कोंडिराम गायकवाड यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शहीदांना मानवंदना अर्पण केली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली.

या प्रसंगी युवकांनी देशभक्ती, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रप्रेमाचा आदर्श अंगी कारावा, असा संदेश माजी सैनिकांनी दिला. कारगिल विजय दिनाचा हा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण, प्रेरणादायी आणि राष्ट्राभिमान जागविणारा ठरला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!