भोंगवली प्रकल्पाविरोधात संघर्ष समितीची स्थापना ! शांततापूर्ण आंदोलनाचा निर्धार !! शेती, पर्यावरण आणि जलस्रोतांच्या रक्षणासाठी ७१ गावांचा एल्गार
कापूरहोळ : भोर तालुक्यातील भोंगवली येथे प्रस्तावित जी.एस. पुणे थ्री ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेडच्या पावर सबस्टेशन प्रकल्पाविरोधात आता जनआंदोलनाची ठिणगी पडली असून ७१ गावांतील ग्रामस्थांनी एकजूट दाखवत प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे. मंगळवार (दि. २८ जुलै) धांगवडी येथील बळीराजा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बैठकीत प्रकल्पाविरोधात व्यापक लढा उभारण्याचा निर्धार करत ‘भोंगवली बचाव कृती समिती’ची स्थापना करण्यात आली.
या बैठकीस भोर-राजगड-मुळशीचे माजी आमदार संग्राम थोपटे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड,माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, पंचायत समिती उपसभापती विशाल कोंडे, माजी उपसभापती रोहन बाठे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष गणेश खुटवड, गणेश निगडे, महेश टापरे तसेच भोंगवली सोलर सब स्टेशन व टॉवर लाईन हटाव कृती समितीचे बाळासाहेब शेडगे यांच्यासह विविध गावांतील पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत प्रकल्पामुळे शेती, पर्यावरण, जलस्रोत आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली. हायटेन्शन टॉवर लाईनमुळे सुपीक जमिनी बाधित होणार असून ग्रामीण भागातील विकासावरही त्याचा विपरीत परिणाम होईल, असे मत उपस्थितांनी मांडले. त्यामुळे प्रकल्प रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
प्रकल्पाविरोधात पुढील काळात भोर तालुका बंद, तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा, गावागावांत जनजागृती मोहीम, लोकप्रतिनिधींना निवेदने तसेच विविध लोकशाही मार्गांनी आंदोलन उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. बाधित शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ७/१२ उतारे देऊ नयेत तसेच टॉवर उभारणीसाठी जमीन उपलब्ध करून देऊ नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. प्रकल्पस्थळी जाणारे रस्ते व पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर रास्ता रोको आंदोलन करण्याबाबतही चर्चा झाली. मात्र, सर्व आंदोलने शांततापूर्ण व कायदेशीर चौकटीत करण्यावर भर देण्यात आला.
दरम्यान, नव्याने स्थापन झालेल्या ‘भोंगवली बचाव कृती समिती’च्या अध्यक्षपदी संग्राम थोपटे, उपाध्यक्षपदी विक्रम खुटवड व कुलदीप कोंडे, कार्याध्यक्षपदी चंद्रकांत बाठे तर सचिवपदी बाळासाहेब शेडगे यांची निवड करण्यात आली. बैठकीच्या शेवटी ग्रामस्थांनी प्रकल्पस्थळाकडे जाणारा रस्ता बंद करण्याचा निर्णय जाहीर करत भोंगवलीसह ७१ गावांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.




