ताज्या घडामोडी

शिवरे प्रकरणावर भोर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटना आक्रमक !! अधिकाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करा !! प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी


भोर : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायतीत ग्रामसभेदरम्यान झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू हा संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासनासाठी धक्कादायक असल्याची भावना व्यक्त करत भोर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (DNE-136) भोर तालुका शाखेच्या वतीने पंचायत समिती, भोर येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले.

सभेच्या प्रारंभी दिवंगत पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पंचायत समिती भोरचे गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत संघटनेच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला. ग्रामसभा ही गावाच्या विकासासाठी आणि लोकशाही व्यवस्थेचा पाया असली तरी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणारी शिवीगाळ, धमक्या, मानसिक दबाव व शासकीय कामात अडथळे निर्माण करण्याच्या वाढत्या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Advertisement

संघटनेने ग्रामसभा व इतर शासकीय कामकाजा दरम्यान अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध करून देणे, गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणे तसेच मानसिक छळ आणि सोशल मीडियावरील बदनामी रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी केली. शिवरे येथील घटना ही केवळ एका अधिकाऱ्याच्या मृत्यूपुरती मर्यादित नसून संपूर्ण ग्रामपंचायत विभागाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर इशारा असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.

राज्य शाखेच्या निर्णयानुसार ग्रामसभा बहिष्कार आंदोलनाला भोर तालुका शाखेने सक्रिय पाठिंबा जाहीर केला. यावेळी तालुका अध्यक्ष नवनाथ झोळ, सचिव महेश कालेकर, उपाध्यक्ष परमेश्वर खटके, कोषाध्यक्ष अशोक ढवळे, कार्याध्यक्ष भूषण पुरोहित, प्रसिद्धीप्रमुख सुनील भोकरे, कार्यकारिणी सदस्य योगेश चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून दिवंगत अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी सभेत करण्यात आली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!