रोहीडा पर्यटन निवासाच्या उद्घाटनावरून वाद ! ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवकांसह सदस्य गैरहजर !! उद्घाटनानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण
भोर : ऐतिहासिक रोहीडा (विचित्रगड) किल्ल्याच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या पर्यटन निवासाच्या उद्घाटन सोहळ्यावरून भोर तालुक्यात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा हा प्रकल्प नुकताच उद्घाटित झाला असला, तरी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत स्थानिक नागरिक, पर्यटक आणि शिवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
रोहीडा किल्ला हा भोर तालुक्यातील ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध व्हावी आणि पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने पर्यटन निवास उभारण्यात आला आहे. मात्र, उद्घाटन सोहळ्यात स्थानिकांना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळाले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक तसेच अन्य चार सदस्य अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यांच्या गैरहजेरीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी यामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. स्थानिक पातळीवरील समन्वयाचा अभाव आणि प्रोटोकॉलबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, रोहीडा परिसरातील पायवाटा, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांकडे अद्यापही अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. उद्घाटन सोहळा पार पडला असला, तरी या गैरहजेरीमागील कारणे आणि स्थानिकांच्या नाराजीमुळे हा विषय आगामी काळात तालुक्याच्या राजकीय व सामाजिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच, तालुक्यात यापूर्वी विविध कामांची वेगवेगळ्या स्तरावर दोन-दोन उद्घाटने झाल्याच्या पार्श्वभूमीवर, या प्रकल्पाबाबतही पुढे काही वेगळे घडते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




