CNG (सीएनजी) वाहतूक कंपनीला ११.५२ लाखांचा गंडा ! खेडशिवापूर ते कापूरहोळ पर्यंत सात पेट्रोल पंपांवर कथित गैरव्यवहार !! १५ जणांविरुद्ध राजगड पोलिसांत गुन्हा दाखल
कापूरहोळ : सीएनजी गॅसची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या इंधन व्यवहारात कथित गैरव्यवहार करून कंपनीची ११ लाख ५२ हजार ४९७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी १३ जणांसह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे भोर तालुक्यातील इंधन व्यवहारांबाबत चर्चेला उधाण आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर २०२५ ते ८ जून २०२६ या कालावधीत शिंदेवाडी ते सारोळा पेट्रोलपंप परिसरासह विविध ठिकाणी हा कथित प्रकार घडला. जिओ फास्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या पुणे विभागातील सीएनजी पंपांना गॅसची वाहतूक करणाऱ्या अशोक लेलँड वाहनांच्या चालकांनी एचपी कंपनीच्या ड्राइव्ह ट्रॅक प्रीपेड फ्युएल कार्डचा गैरवापर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
खेडशिवापूर, वरवे बुद्रुक, केळवडे आणि कापूरहोळ परिसरातील सात पेट्रोल पंपांवर वाहनांमध्ये प्रत्यक्ष इंधन न भरता, तसेच वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिक गॅस भरल्याचे दाखवून रोख रक्कम स्वीकारल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या कथित व्यवहारांमुळे कंपनीचे ११ लाख ५२ हजार ४९७ रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी अविनाश रोहिदास आगळे यांनी राजगड पोलिसांत फिर्याद दिली. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.०१ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(४) व ३(५) अन्वये गुन्ह्याची नोंद झाली आहे.वरिष्ट पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मछले या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.




