ताज्या घडामोडी

मुंबईच्या विकासात योगदान, तरी हक्काच्या घरांपासून वंचित ! कापूरहोळच्या सभेत गिरणी कामगारांचा आक्रोश


कापूरहोळ : मुंबईतील हक्काच्या घरांपासून वंचित असलेल्या भोर-राजगड तालुक्यातील गिरणी कामगारांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून, नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. कापूरहोळ येथील हॉटेल जय महाराष्ट्र येथे झालेल्या सभेत घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार करण्यात आला. ‘करो या मरो’ची भूमिका घेतल्याची माहिती संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे कार्याध्यक्ष रमाकांत बने यांनी दिली.

भोर-राजगड तालुक्यातील दोन हजारांहून अधिक गिरणी कामगार गेल्या अनेक वर्षांपासून हक्काच्या घरांसाठी संघर्ष करीत आहेत. मुंबईत स्वतःचे घर मिळावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र, दीर्घकाळ प्रतीक्षा करूनही अनेक कामगारांना घरांचा लाभ मिळालेला नाही.

Advertisement

राज्यातील एक लाख ४८ हजार गिरणी कामगारांनी घरांसाठी अर्ज केले होते. त्यापैकी एक लाख १२ हजार कामगार पात्र ठरले; मात्र, मोठ्या संख्येने पात्र कामगार अद्याप घरवाटपापासून वंचित आहेत. मुंबईच्या औद्योगिक विकासात मोलाचे योगदान देऊनही वृद्धापकाळात घरासाठी संघर्ष करावा लागत असल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे.

पात्र गिरणी कामगारांना मुंबईत हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी सभेत करण्यात आली. मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

यावेळी चळवळीचे सरचिटणीस गोपाळ शेलार, पुणे अध्यक्ष रमेश जेचे, रमाकांत बने, निलेश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि गिरणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हक्काच्या घरांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!