होमगार्ड जवानांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गृहराज्यमंत्र्यांना निवेदन ! न्याय्य हक्कांसाठी जनकल्याण सेवा प्रतिष्ठान मैदानात
पुणे : महाराष्ट्रातील होमगार्ड जवानांच्या विविध प्रलंबित मागण्या, हक्क आणि समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनकल्याण सेवा प्रतिष्ठानच्या वतीने राज्याचे गृहराज्यमंत्री (शहरी) योगेश कदम तसेच गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी जनकल्याण सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरज नंदकुमार ढवळे व मिलिंद सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने होमगार्ड जवानांसमोरील विविध प्रश्न मांडले. जवानांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
होमगार्ड जवानांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सेवेला न्याय मिळावा आणि शासनाने त्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्यावी, यासाठी प्रतिष्ठान सातत्याने प्रयत्नशील असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच होमगार्डच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेला संघर्ष मागण्या पूर्ण होईपर्यंत थांबणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
गृहराज्यमंत्र्यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विषयांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळाकडून देण्यात आली. दरम्यान, लवकरच गृह खात्याकडून होमगार्ड जवानांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




