करंदी खे.बा.येथे विहिरीत पडलेल्या दुर्मिळ ‘जवाडी मांजरा’ला वनविभागाकडून जीवदान ! वनविभाग आणि सर्पमित्रांची संयुक्त रेस्क्यू मोहीम यशस्वी
नसरापूर : भोर तालुक्यातील करंदी खे.बा. येथे शेतातील विहिरीत पडलेल्या दुर्मिळ जवाडी मांजराची (Jungle Cat) वनविभाग आणि पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनच्या सदस्यांनी संयुक्त रेस्क्यू मोहिमेद्वारे सुखरूप सुटका केली. कोणतीही इजा न होता या वन्यजीवाला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वनविभागाच्या तत्परतेचे आणि सर्पमित्रांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
करंदी खेबा येथील शेतकरी भालचंद्र कापरे यांच्या शेतातील विहिरीत जवाडी मांजर पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने वनरक्षक पूजा विष्णू खंडाळे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनरक्षक खंडाळे यांनी सर्पमित्रांना पाचारण केले.
या रेस्क्यू मोहिमेत वनरक्षक पूजा खंडाळे, वनमजूर साहेबराव चव्हाण, बाळू शेलार तसेच सर्पमित्र विलास धोंगडे, श्रीकांत खेडकर आणि सायली वालगुडे यांनी सहभाग घेतला. सर्वांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे जवाडी मांजराला सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यात यश आले.
उघड्या विहिरी वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत असल्याने त्यांना संरक्षित करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.




