सारोळ्यात प्रेमसंबंधांच्या संशयातून तरुणाचा खून ! आरोपीविरुद्ध राजगड पोलिसांत गुन्हा दाखल
कापूरहोळ : पुणे-बेंगलोर महामार्गालगतच्या सारोळा (ता. भोर) येथे प्रेमसंबंधांच्या संशयावरून तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २७) रात्री घडली. या प्रकरणी राजगड पोलिसांनी उत्तर प्रदेशातील दीपक मनोहर पाल याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर पवार हा गुरुवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास सारोळा-वीर मार्गावर महेश धाडवे यांच्या घरासमोरून पायी जात होता. त्याचवेळी आरोपी दिपक पाल याची पत्नी व लहान मुलगीही त्या रस्त्याने जात होती. अमर पवार आणि आरोपीच्या पत्नीमध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय दीपक पाल याच्या मनात होता. याच संशयातून व रागाच्या भरात त्याने अमर पवारचा पाठलाग केला. संधी साधून आरोपीने अमर पवार याच्यावर धारदार चाकूने हल्ला चढवला. गळा व मानेवर सपासप वार केल्याने अमर पवार गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे सारोळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.




