कापूरहोळमध्ये ‘हिट अँड रन’ ! सर्व्हिस रोडवर पाठीमागून धडक देऊन दुचाकीस्वार फरार !! राजगड पोलिसांत अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्गालगतच्या कापूरहोळ येथील सर्व्हिस रोडवर भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या अज्ञात दुचाकीने पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातानंतर जखमी नागरिकाला मदत न करता दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भानुदास रामचंद्र बरदाडे (वय ६४, रा. साळोबाचीवाडी, कापूरहोळ) हे ३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कापूरहोळ चौकातून पायी घरी जात होते. पाटील हॉस्पिटलसमोरील पीएमटी बसथांब्याजवळ ते पोहोचले असता कापूरहोळकडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरून आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
अपघातात बरदाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. धडक एवढी जोरदार होती की ते रस्त्यावर कोसळले. अपघातानंतर दुचाकीस्वाराने मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरून पलायन केले. जखमी बरदाडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी गणेश भानुदास बरदाडे (वय ३६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार दुचाकीस्वाराचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस हवालदार निंबाळकर करीत आहेत.




