ताज्या घडामोडी

भोर तालुक्यातील आपटी गावात रानडुकराचा सहा वर्षीय बालकावर हल्ला ! ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला !! वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी


भोर : आपटी येथील सहा वर्षीय बालकावर रानडुकराने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात शार्दूल हर्षल पारठे हा बालक जखमी झाला. प्रसंगावधान राखत ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेतल्याने बालकाला वाचविण्यात यश आले. जखमी शार्दूलला ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.

या घटनेमुळे आपटी परिसरात खळबळ उडाली असून, वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराबाबत नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवी वस्तीजवळ वन्यप्राण्यांचा वावर होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Advertisement

दरम्यान, सहाय्यक वनसंरक्षक शीतल राठोड यांच्या सूचनेनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत आणि वनपरिमंडळ अधिकारी रोहन इंगवले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच घटनेची माहिती घेत परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला, यावेळी माजी सरपंच शंकर पारठे, अंकुश पारठे आणि जगन्नाथ पारठे उपस्थित होते.

वन्यप्राण्यांच्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याने वनविभागाने परिसरात नियमित गस्त वाढवावी आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी वनविभागाने सतर्क राहून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!