ताज्या घडामोडी

भोंगवलीत बाल संरक्षण व सुरक्षिततेचा जागर ! चांगला स्पर्श-वाईट स्पर्श, बालकांचे हक्क आणि स्वसंरक्षणाबाबत जनजागृती !! पोलीस आणि आरोग्य विभागाकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


सारोळा : बालकांचे संरक्षण, सुरक्षितता आणि बालहक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भोंगवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व संत लिंगनाथ स्वामी विद्यालय, राजगड ज्ञानपीठ येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने बाल संरक्षण व बाल सुरक्षितता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमात राजगड पोलीस स्टेशन, कामथडी येथील पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) शितल थेंबे, पोलीस अंमलदार पूनम मांगले, देशमुख साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना बाल संरक्षण व स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यांतील फरक ओळखणे, अनुचित प्रसंगात न घाबरता विश्वासू व्यक्तीची मदत घेणे आणि स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग राहणे, याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

Advertisement

प्राथमिक आरोग्य केंद्र, भोंगवली येथील डॉ. नेहा शेवाळे, मनीषा कांबळे, वर्षा सुर्वे आणि रवीना साळुंखे यांनी बालकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि जागरूकतेविषयी उपयुक्त माहिती दिली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक थोरवे, उपशिक्षक निगडे, भागवत, भंडलकर, वाघ मॅडम आणि पूजा गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले. गावच्या सरपंच अनुराधा शेडगे, पोलीस पाटील गणेश निगडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन लंके, पत्रकार, पालक, ग्रामस्थ, समिती सदस्य तसेच उपस्थित महिला भगिनींनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

बालकांचे संरक्षण ही केवळ पालक आणि शिक्षकांचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. बालकांना सुरक्षित वातावरण मिळावे, त्यांनी निर्भयपणे आपल्या अडचणी मांडाव्यात आणि कोणत्याही अनुचित प्रसंगाची माहिती विश्वासू व्यक्तीला द्यावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. बालकांच्या सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने घेतलेल्या पुढाकाराचे उपस्थितांनी कौतुक केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!