भोर तालुक्यातील पसुरे येथे भजन स्पर्धेचे यशस्वी आयोजन ! मिरजेवाडीच्या भजन मंडळाचा प्रथम क्रमांक
पसुरे : दुर्गामाता महिला भजनी मंडळाच्या वतीने आयोजित भजन स्पर्धेत मिरजेवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील ओम चैतन्य कानिफनाथ भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. या मंडळाला सात हजार रुपयांचे रोख बक्षीस, चषक व प्रमाणपत्र देण्यात आले.
नानाचीवाडी, शिंदे (ता. भोर) येथील श्री ज्ञानाई भजन मंडळाने द्वितीय क्रमांक मिळवून पाच हजार, विंग (ता. खंडाळा) येथील रामेश्वर भजन मंडळाने तृतीय क्रमांकासह तीन हजार तर नसरापूर (ता. भोर) येथील स्वामी समर्थ भजनी मंडळाने उत्तेजनार्थ दोन हजार रुपयांचे बक्षीस जिंकले. स्पर्धेचे हे पंधरावे वर्ष असून अकरा संघांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन सरस्वती वीनापूजन व दीपप्रज्वलनाने झाले. दुर्गामाता महिला भजनी मंडळाने पंचपदी सादर करून स्पर्धेला सुरुवात केली. प्रत्येक मंडळाने १२ मिनिटांत एक अभंग व एक गवळण गायले. सर्वांना सहभाग प्रमाणपत्र मिळाले.
निरीक्षक म्हणून खटाव (सातारा) येथील किरण भोसले व रवींद्र खंडाळकर यांनी काम पाहिले. पखावज, ढोलकी व तबला जुगलबंदीने कार्यक्रम सजला. भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी खान हॉस्पिटलचे डॉ. इम्रान खान, धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉ. चैतन्य गायकवाड, शांताराम सणस, महेंद्र व उत्तम शिंदे, संदीप बिहामणे, ज्ञानेश्वर अनभुले यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक तंटामुक्ती अध्यक्ष मनोज धुमाळ, सूत्रसंचालन भानुदास दुधाणे यांनी केले. मंडळाच्या अध्यक्षा प्रमिला जंगम, उपाध्यक्ष लता बिहामणे, सचिव सुरेश जंगम, विलास दुधाणे, भानुदास दुधाणे, राजेंद्र गव्हाणे यांनी यशस्वी नियोजन केले. पंचक्रोशीतील प्रेक्षक उपस्थित होते.




