खोपीत बिबट्याचा कहर ! दोन पाळीव व तीन भटक्या कुत्र्यांसह वासराचा फडशा !! शेतकऱ्यांत भीती
खेडशिवापुर : भोर तालुक्यातील खोपी परिसरात गेल्या दहा दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीत बिबट्याने तीन पाळीव व दोन भटक्या कुत्र्यांचा फडशा पाडल्याची माहिती समोर आली असून, आता पशुधनावरही हल्ला झाल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
खोपी येथील शेतकरी स्वप्नील डिंबळे यांच्या गायीच्या वासरावर रविवारी बिबट्याने हल्ला केला. वासराला जवळच्या शेतात ओढून नेल्यानंतर त्याला ठार करून काही भाग फस्त केला. सोमवारी सायंकाळी बिबट्या पुन्हा त्याच ठिकाणी आला आणि वासराचे उर्वरित अवशेषही घेऊन गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती वाढली असून, शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांसह पशुपालकांमध्येही दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून नागरिक व पशुधनाची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी होत आहे.
खोपीचे सरपंच तुषार कांबळे यांनी वन विभागाचे अधिकारी संदीप ससाणे यांना लेखी निवेदन देत परिसरात तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
वन विभागाचे अधिकारी संदीप ससाणे यांनी घटनेची गंभीर दखल घेत परिसराची पाहणी केली. बिबट्याच्या पायांचे ठसे संकलित करण्यात आले असून, त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. ससाणे व त्यांचे सहकारी रात्रीच्या वेळी गस्त घालत असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.




