ताज्या घडामोडी

कापूरहोळ चौकात शेतकऱ्यांचा एल्गार ! अडीच तास रास्ता रोको !! जिल्हाधिकाऱ्यांची मध्यस्थी !!! लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित


कापूरहोळ : भोर तालुक्यातील भोंगवली येथे प्रस्तावित सोलर सबस्टेशन तसेच राजगड तालुक्यातील काही गावांत उभारण्यात येणाऱ्या उच्चदाब वीजवाहिनी व टॉवर प्रकल्पाच्या विरोधात रविवारी (दि. २३) कापूरहोळ येथे पुणे-सातारा महामार्गावर तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले.

सर्वपक्षीय कृती समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भोर व राजगड तालुक्यातील तब्बल ११६ गावांतील चार ते पाच हजार शेतकरी सहभागी झाले होते. सकाळपासूनच आंदोलकांनी कापूरहोळ चौकात ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून महामार्गाच्या दोन्ही बाजूंना चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी अटक केलेल्या शेतकऱ्यांना जामीन प्रक्रियेत सहकार्य करणे, उर्वरित प्रकरणांबाबत सकारात्मक भूमिका घेणे तसेच पुढील आठवड्यात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करून संबंधित विषयावर सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको तात्पुरता मागे घेतला.

Advertisement

प्रशासनाच्या लेखी आश्वासनातील प्रमुख मुद्दे :
१) अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून सहकार्य.
२) उर्वरित शेतकऱ्यांवरील दाखल गुन्ह्यांबाबत सकारात्मक विचारकरून गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन.
३) येत्या गुरुवारी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठकीचे नियोजन

या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, कृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार संग्राम थोपटे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक भालचंद्र जगताप, जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, जिल्हा परिषद सदस्य पोपट सुके, प्रवीण जगदाळे, भोर पंचायत समिती सभापती मनीषा कंक, उपसभापती विशाल कोंडे, शिवसेना नेते माऊली शिंदे, बाळासाहेब शेडगे, दिनकर धरपाळे, गणेश निगडे, अनिकेत शिंदे, सचिन बांदल, महेंद्र भोरडे  यांच्यासह मोठया संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!