भोर-राजगड टॉवर लाईनविरोधात उद्या कापूरहोळ येथे रास्ता रोको आंदोलन
कापूरहोळ : भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यांतील ७१ गावांच्या हद्दीत प्रस्तावित उच्चदाब वीज टॉवर लाईन व सबस्टेशन प्रकल्पाविरोधातील संघर्ष शनिवारी (२३ ऑगस्ट) निर्णायक वळणावर पोहोचणार असून, कापूरहोळ येथे पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावर भव्य रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात हजारो शेतकरी, ग्रामस्थ, महिला व युवक सहभागी होणार असल्याची माहिती संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
प्रस्तावित टॉवर लाईनमुळे सुपीक शेती, फळबागा, घरे तसेच पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होणार असल्याची भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय आणि स्थानिकांच्या भावना विचारात न घेता प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून विविध गावांमध्ये ग्रामसभा, बैठका, मोर्चे, जनजागृती मोहिमा आणि निषेध कार्यक्रम राबवून प्रकल्पाविरोधातील जनमत अधिक तीव्र करण्यात आले आहे.
उद्याच्या रास्ता रोको आंदोलनात ७१ गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष समितीने केले आहे. “टॉवर लाईन नकोच”, “जमीन आमची, हक्क आमचा” आणि “शेती वाचवा, शेतकरी वाचवा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमणार असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने प्रकल्पाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करून शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा असे संघर्ष समितीने आव्हान केले आहे.




