ताज्या घडामोडी

चंद्रकांत बाठे यांची सामाजिक बांधिलकी : ग्रामीण विकास आणि युवक सबलीकरणाचा नवा अध्याय


 

किकवी : भोर तालुक्यातील युवकांना शहरी भागांप्रमाणे सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी समाजसेवक चंद्रकांत बाठे यांनी घेतलेला पुढाकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी ग्रामीण भागात नामशेष होत चाललेला कबड्डीचा खेळ पुन्हा जिवंत केला असून, त्यांच्या प्रयत्नातून पांडे येथे सहा एकर जागेमध्ये भोर तालुक्यातील पहिले क्रीडांगण उभे राहिले आहे. या क्रीडांगणात पोलीस भरती, मिलिटरी भरती तसेच इतर शारीरिक परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच वैयक्तिक आणि सामूहिक खेळांसाठीही हे मैदान सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सहा एकर जागेत हे क्रीडांगण आकार घेत असून स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातून आत्तापर्यंत 21 लाख रुपयांचा खर्च यात करण्यात आला आहे. होतकरू खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून हे स्वप्न साकार झाले आहे. पुढील काळात या क्रीडांगणाचे क्रीडा संकुलामध्ये रूपांतर करण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती चंद्रकांत बाठे यांनी पत्रकार परिषदेत दिली

भोर तालुक्यातील करंदी येथे संगमनेर ते खुलशी या परिसरातील युवकांसाठी सरकरी गायरान जागेत तब्बल 38 एकर क्षेत्रावर नवीन क्रीडांगण उभारले जाणार आहे. या मैदानात युवकांसाठी विविध वैयक्तिक आणि सामूहिक खेळांच्या सुविधा उपलब्ध होतील. कोणत्याही सामाजिक कार्यात किंवा खेळाडूंना अडचण आल्यास त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल आणि भविष्यातही हा मदतीचा ओघ सुरू राहील असे बाठे यांनी स्पष्ट केले.

Advertisement

या परिषदेत बाठे यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय कामांचाही उल्लेख करण्यात आला. केंजळ येथील जिल्हा परिषद शाळेतील ऊर्जा पार्क, कापूरहोळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई वीर धाराऊ माता स्मारक, तसेच आठ कोटी पंचवीस लाखांचा पुनर्वसन निधी अशा विविध प्रकल्पांचा उल्लेख बाठे यांनी केला.

आमदार मांडेकर यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या चार कोटी रुपयांच्या निधीमुळे कामथडी-भोंगवली गटामधील गावाच्या विकासकामांना गती मिळणार आहे.

भोंगवली, वरवे आणि शिवरे परिसरात जिल्हा परिषद शाळांना मॉडेल स्कूलच्या स्वरूपात विकसित करण्यात येणार असून केंद्र पॅटर्नचा अवलंब केला जाणार आहे. त्याचबरोबर ऑन-ग्रीड, ऑफ-ग्रीड आणि हायब्रिड सोलर योजनांच्या माध्यमातून गावागावांत वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील महामार्ग अपघातग्रस्तांना तातडीची मदत, तसेच अंडरपास मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याचे काम देखील सुरू आहे.

ग्रामीण भागातील बेरोजगारी हा सर्वात मोठा प्रश्न असून, त्यावर उपाय म्हणून सोलर प्रशिक्षण, बांधकाम आणि वाहतूक व्यवसायात युवकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जात आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडी, शाळा, रस्ते आणि पाणीपुरवठा या मूलभूत गरजांवरही विशेष काम होणार आहे.

महिलांच्या रोजगारनिर्मितीसाठी स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे. गावातील अंतर्गत व जोड रस्त्यांसाठी दर्जेदार कामे करण्यासंबंधी काटेकोर पावले उचलली जाणार आहेत. चांगल्या ठेकेदारांमार्फत गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करण्यावरही बाठे यांनी विशेष भर दिला.

चंद्रकांत बाठे यांच्या या पुढाकारामुळे भोर तालुक्यातील ग्रामीण भागात विकास, क्रीडा आणि रोजगाराच्या संधींमध्ये नवा अध्याय सुरू होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!