भोरच्या हिरडस मावळातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ! अवकाळी पावसाचा भातशेतीला तडाखा !! शेकडो एकरांवरील पीक पाण्यात
भोर : भोर तालुक्यात शुक्रवारी (दि. ३०) झालेल्या अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हिरडस मावळातील हिडोशी, भावेखल आणि परिसराला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
भात कापून खाचरात सुकवण्यासाठी ठेवले असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले. अनेक ठिकाणी कापलेले भात पाण्यात भिजून नासले, तर काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेली. शेकडो एकरांवरील भातशेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पेंढा भिजल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
भावेखल येथील शेतकरी विठ्ठल बडे म्हणाले, महिनाभर मेहनत करून पीक हातात आले होते; मात्र पावसाने सर्व नुकसान केले. अंकुश मादगुडे यांनीही शासनाने तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. महसूल व कृषी विभागाने त्वरित पाहणी करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणीही होत आहे.




