ताज्या घडामोडी

भोर तालुक्यातील करंजगावात महाकाय अजगराला जीवदान ! लांबी १४ फुट ; वजन तब्बल ४० किलो !! सर्पमित्रांच्या तत्परतेने नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन


भोर : भोर तालुक्यातील करंजगाव येथे तब्बल १४ फूट लांबीचा आणि अंदाजे ४० किलो वजनाचा महाकाय अजगर आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत अजगराला सुरक्षितपणे पकडून त्याला जीवदान दिले. त्यानंतर देवघर वनक्षेत्रात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

करंजगावच्या पोलीस पाटलांनी याबाबत भोरमधील सर्पमित्रांना माहिती दिली. त्यानुसार सर्पमित्र सतीश पारवे, नील बर्वे आणि रोहित नलावडे यांनी घटनास्थळी पोहोचून मोठ्या शिताफीने महाकाय अजगराला सुरक्षितपणे पकडले. वनरक्षक इंगवले यांच्या उपस्थितीत अजगराला देवघर वनक्षेत्रात सोडण्यात आले. त्यामुळे या वन्यजीवाला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यास यश आले.

Advertisement

पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनच्या माध्यमातून भोर तालुक्यातील सर्पमित्र अनेक वर्षांपासून वन्यजीव संरक्षणाचे काम करीत आहेत. मानवी वस्तीत आढळणाऱ्या सापांना सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्याकडून केले जाते.

सर्पमित्रांना शासकीय ओळखपत्र द्या..!
वन्यजीव संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या सर्पमित्रांना वनविभागाने अधिकृत शासकीय ओळखपत्र, आवश्यक सुरक्षा साहित्य आणि साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी सर्पमित्रांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत असून, त्यांच्या कार्याला वनविभागाने आवश्यक सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!