ताज्या घडामोडी

भोर तालुक्यातील रायरेश्वर परिसरातील दुर्मिळ घटना ! रानगव्यापासून पाळीव म्हशीला स्त्रीलिंगी जातीचे रेडकु


 

भोर : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये रायरेश्वर मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेला ऐतिहासिक परिसर आहे. अशा ऐतिहासिक व निसर्गसंपन्न क्षेत्रात पाळीव म्हशीला रानगव्यापासून रेडकु झाल्याची एक घटना घडली असून पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दुर्मिळ घटनांपैकी एक मानली जात आहे. स्थानिकांनीही या घटनेला निसर्गाची अद्भुत देणगी मानत उत्साहाने चर्चा करत असून आता वनविभागाचा निर्णय व वैज्ञानिक तपासणी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रायरेश्वर मंदिराजवळील माळवाडी येथे घडलेली एक घटना ऐकून आणि पाहून संपूर्ण तालुका थक्क झाला आहे. शेतकरी वाघमारे यांच्या पाळीव म्हशीने जन्म दिलेले रेडकु हे साधारण म्हशीसारखे नसून त्याचे स्वरूप रानगव्या सारखे आहे. शरीराचा रंग काळा आणि पांढरा मिश्रित, मजबूत अंगकाठी, डोक्यावरील रचना व डोळ्यांतील चमक पाहून हे रेडकाचे रानगव्याशी साम्य असल्याचे स्पष्ट होते.

Advertisement

या घटनेची माहिती ज्येष्ठ सर्पमित्र व पुणे जिल्हा वन्य प्राणी व सर्प रक्षक असोसिएशनचे सदस्य तबरेज खान यांना मिळताच त्यांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधला. यानंतर वन अधिकारी इंगवले  आणि वन अधिकारी भोई  घटनास्थळी येऊन पाहणी केली व निरीक्षणानंतर हे रेडकु रानगव्याच्या वैशिष्ट्यांसह असल्याचे स्पष्ट झाले. आता त्याचा नेमका वांशिक संबंध निश्चित करण्यासाठी डीएनए तपासणी व रक्त परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतरच रेडकु त्याच ठिकाणी ठेवायचे की ट्रान्झिट सेंटर अथवा वन्यजीव संवर्धन केंद्रात हलवायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे.

विशेष म्हणजे पाळीव म्हैस व रानगव्याच्या संगमातून जन्मलेले रेडकु म्हणजे एक अत्यंत दुर्मिळ जैविक घटना आहे. अशा संकरातून जन्मलेल्या पिल्ल्यांच्या वाढीमान, प्रजननक्षमता आणि भविष्यातील अस्तित्वाबाबत नेहमीच शास्त्रीय शंका निर्माण होतात.

या प्रसंगी सर्पमित्र तबरेज खान यांच्यासोबत सर्पमित्र विशाल शिंदे देखील उपस्थित होते. त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांसोबत समन्वय साधत वनविभागाशी संपर्क केला म्हणूनच वनविभागाकडून या घटनेचा सखोल अभ्यास करुन पुढील  निर्णय घेण्यात येईल असे  सांगण्यात आले आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!