राष्ट्रवादी व ओबीसी नेते छगन भुजबळ घेणार मंत्रिपदाची शपथ ! अन्न व पुरवठा मंत्रीपद मिळण्याची शक्यता
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व ओबीसी नेते छगन भुजबळ उद्या मंगळवार दिनांक 20 मे 2025 रोजी मंत्रीपदाची शपथ घेणार असून त्यांना अन्न व पुरवठा मंत्रीपद हे रिक्त झालेले असल्याने तेच मंत्रीपद त्यांना मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली,
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर वाढता विरोध लक्षात घेता धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनाम दिल्याने तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राज्य सरकारमधील अन्न व पुरवठा मंत्री हे पद रिक्त झालं असल्याने या मंत्रीपदावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागू शकते. मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ आधीच नाराज होते. यामुळे छगन भुजबळ यांना यानिमित्ताने मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांची नाराजी दूर केली जाऊ शकते.
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर त्यांची भाजप सोबतची जवळीक वाढल्याचं बोललं जात होते. भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करतील अशी देखील चर्चा होती. त्यामुळे भुजबळांसारखा ओबीसी नेता साथ सोडू नये यासाठी देखील त्यांना मंत्रिपद देऊन पक्षासोबत सन्मानाने ठेवण्याची भूमिका अजित पवार घेत असल्याचे समजते.
राजकारणारणात जातीच्या राजकारणाला महत्त्व असतं. त्यामुळे धनंजय मुंडेंसारख्या ओबीसी नेत्याच्या जागी दुसऱ्या ओबीसी नेत्यांला मंत्रिमंडळात स्थान देण्याकडे अजित पवारांचा कल दिसत आहे. कारण छगन भुजबळ यांच्या मागे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात उभा आहे. याचा फायदा पक्षाला नक्कीच होईल. त्यामुळे मंत्रिमंडळातील ओबीसी नेत्यांची पोकळी छगन भुजबळ भरून काढू शकतात.
मंगळवारी सकाळी 10 वाजता छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, पूर्वी मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज होते. त्यानंतर छगन भुजबळ यांना यानिमित्ताने मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांची नाराजी दूर केली जाणार आहे.




