भोरमध्ये सत्तासंग्राम रंगात ! नगराध्यक्षपदासाठी चुरशीची शर्यत !! भाजप-राष्ट्रवादीमध्ये थरार
भोर : तब्बल सात-आठ वर्षांनंतर होणाऱ्या भोर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. शहरात सणासुदीचा माहोल निर्माण झाला असून पक्षांचे इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदार निवडणूक प्रचारात उत्साहाने सहभागी झाले आहेत. सर्वत्र प्रचार फेऱ्या, घराघरांत मतदार संवाद आणि बॅनर–पोस्टरच्या गर्दीमुळे शहराचा चेहरामोहरा निवडणुकीच्या रंगात रंगला आहे.
या निवडणुकीत नव्या प्रभागरचनेनुसार दहा प्रभागांतून वीस नगरसेवक निवडले जाणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी एकूण आठ अर्ज प्राप्त झाले असले तरी त्यांपैकी चार अर्ज छाननीदरम्यान अपात्र ठरले आहेत. नगरसेवकपदासाठी तब्बल 124 अर्जांपैकी 66 अर्ज बाद झाल्याने उर्वरित उमेदवारांमध्ये चूरशीची स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी संजय दत्तात्रय जगताप हे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली वीस जणांची भाजप पथक निवडणूक रिंगणात असून पक्षाने संघटनबळाचा जोर दाखविला आहे. याला माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पक्षप्रवेशामुळे नवचैतन्य लाभले आहे. आज भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वाघजाई मातेच्या चरणी नारळ फोडून करण्यात आला. या प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून प्रचाराला सुरूवात दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस यांनी देखील आपल्या ताकदीचा झेंडा उंचावत निवडणुकीत उतरायची तयारी केली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती; मात्र यंदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील लढत थरारक होण्याची चिन्हे आहेत. मतदार कोणत्या गटाला पसंती देतील, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत महिला उमेदवारांचाही ठसा उमटतो आहे. सामाजिक प्रश्नांसह महिलांच्या सक्षमीकरणाचे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी आले आहेत. अन्य मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाच्या वादामुळे निवडणुकीला विलंब झाला होता, मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडेल. त्यामुळे शहरातील राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलत आहेत. मतदारांचा कौल नगरपालिका सत्तेचे भवितव्य ठरवणार असल्याने प्रत्येक मताचे मूल्य वाढले आहे. मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा प्रभाव मतदारांवर कितपत पडतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे
.भोर शहरातील राजकीय हालचाली आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहता, या निवडणुकीचा निकाल हा भोरच्या पुढील राजकीय दिशेचे चित्र स्पष्ट करणारा ठरणार आहे. वातावरणात सत्तेचा घमघमाट असून, प्रत्येक कोपऱ्यात चर्चेचा विषय एकच “भोरचा गडी कोण?”




