ताज्या घडामोडी

भोर तालुक्याचे सहाय्यक निबंधक आदिनाथ पालवे यांचा सहकार भारती तर्फे सत्कार


 

भोर : महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था म्हणून नुकतेच आदिनाथ पालवे यांनी भोर तालुक्याचा पदभार स्वीकारला असून त्यांच्या स्वागतार्थ सहकार भारती भोर तालुक्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तालुका अध्यक्ष सदाशिव धुमाळ यांनी त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.या प्रसंगी बोलताना पालवे यांनी तालुक्यातील सर्व कार्यकारी सोसायट्यांच्या सचिवांसाठी लवकरच मार्गदर्शनपर मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

सहकार क्षेत्रात पारदर्शक व जनकल्याणकारी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. “सहकार हा केवळ आर्थिक व्यवहारापुरता मर्यादित न राहता समाजसेवेचा माध्यम व्हावा,” असा संदेश त्यांनी दिला.सहकार भारती ही संस्था 1978 साली स्थापन झाली असून गेली सव्वा चार दशके ती सहकार क्षेत्राच्या मजबुतीसाठी कार्यरत आहे. देशभरातील 500 हून अधिक जिल्ह्यांत तिचे कार्य प्रभावीपणे चालू आहे. ‘बिना सहकार नाही उद्धार’ या प्रेरणादायी घोषवाक्याला ‘बिना संस्कार नाही सहकार’ अशी अर्थपूर्ण जोड देत सहकार भारतीने संस्कार संपन्न सहकार चळवळीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

Advertisement

सत्कार समारंभात अध्यक्ष धुमाळ म्हणाले, “सहकारी साखर कारखान्यांतील अनुभवाचा उपयोग करून तालुक्यातील सहकारी संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.” या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे भोर विभागीय विकास अधिकारी श्री. मारणे यांचाही सन्मान करण्यात आला.समारंभास सहकार भारती महिला प्रमुख सौ. आशाताई शिवतरे, विविध सोसायट्यांचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहकार भारतीचे कार्यकर्ते यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांनी पालवे यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!