भोर तालुक्यात अंगणवाडी भरतीला प्रारंभ ! ८ सेविका व ४० मदतनीस पदांची भरती !! महिलांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी
कापूरहोळ : भोर तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या भरती प्रक्रियेला सोमवार (दि. ६) पासून सुरुवात होेत आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये एकूण ४८ मानधनी पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून, इच्छुक पात्र महिला उमेदवारांना १७ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
बालविकास प्रकल्प अधिकारी मनोज कावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भरतीमध्ये अंगणवाडी सेविकांची ८ पदे आणि अंगणवाडी मदतनीसांची ४० पदे भरली जाणार आहेत.
कापूरहोळ, इंगवली, बोपे, कांबरे खुर्द, कासुर्डी गुमा, पारवडी, जांभळी, नांदधुर या गावांमध्ये सेविकांची पदे उपलब्ध आहेत. तर तालुक्यातील विविध गावांतील ४० मदतनीस पदांसाठीही अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित गावातील स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे. उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षांदरम्यान असावे, तर विधवा महिलांना ४० वर्षांपर्यंत वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. अर्ज करताना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन सादर करणे अनिवार्य राहणार आहे.
भरती प्रक्रियेसाठी अर्ज संबंधित अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे असून, पात्र महिलांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या भरतीमुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होणार आहे.




