पुणे-नगर रोडवरील वाघोलीच्या केसनंद फाट्यावर डंपरने 9 जणांना चिरडले
पुणे : पुणे- नगर रोडवरील वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ मध्यरात्री 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान पुण्याकडून येणाऱ्या बिल्टवेस् इंटरप्राईजेस कंपनीच्या भरधाव डंपरने फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याचा हृदयद्रावक प्रकार घडला आहे. डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला, या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले असून यातील 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
या अपघातात जखमी झालेले सर्व मजूर आहेत. ते रविवारी रात्रीच कामाच्या निमित्ताने अमरावती येथून आले होते. या फुटपाथवर एकूण 12 जण झोपले होते. तर इतर लोक फुटपाथच्या बाजूला एका झोपडीत झोपले होते. यावेळी भरधाव डंपर फुटपाथवर चढला आणि लोकांना चिरडत गेला.जेव्हा ओरडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. त्यानंतर तातडीने पोलिसांना खबर देण्यात आली. दारूच्या नशेत असलेल्या ड्रायव्हरला पुणे पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे.




