न्हावी गावात आठवडे बाजार सुरु : शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा संपली
सारोळा : न्हावी येथे आठवडे बाजार रविवार दि.३ ऑगस्ट रोजी सुरु कऱण्यात आला, आर्थिक उलाढालीसाठी प्रचलित असलेल्या न्हावी गावात आठवडे बाजार सुरू झाल्याने खरेदी-विक्रीसाठी व्यापारी, ग्राहक आणि शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे, भोर तालुक्यातील पुर्व भागातील शेतकरी, विविध भाजी विक्रेते व ग्राहकांना आठवडे बाजार सुरु झाल्याने आनंद व्यक्त केला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक भालचंद्र जगताप यांच्या शुभहस्ते बाजाराचे उद्घाटन झाले. तसेच ग्रामदैवत यमाई मातेला श्रीफळ अर्पण करुन विधिवत पुजापाठ करण्यात करुन आठवडे बाजाराला सुरुवात करण्यात आली. न्हावी ३२२ चे सरपंच शितलताई सोनवणे, सुरेश सोनवणे, न्हावी १५ चे सरपंच भरत सोनवणे, पांडुरंग सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मागिल काही वर्षांपासून यासाठी विशेष प्रयत्न केले.
गावात बाजाराची सोय नसल्याने भाजीपाला व अन्य खरेदीसाठी आठवडे बाजार असणाऱ्या गावाला जावे लागत होते, महिला बचत गटाने उत्पादित केलेला भाजीपाला, अन्य साहित्यांसह गावातील शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीची संधी मिळेल, दर आठवड्याला बाजारातून भाजी-पाला तसेच जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आठवडे बाजारास पसंती देतील, त्यानुसार या बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होईल. शितल सोनवणे, सरपंच न्हावी ३२२
या आठवडे बाजारांत येणाऱ्या ग्राहकांमुळे परिसरातील अर्थकारणास चालना मिळेल, अनेकांचा उदरनिर्वाह आठवडे बाजारावर अवलंबून असतो.आठवडे बाजारात केवळ भाजी-पाला याची विक्री न होता इतर ही गरजेच्या वस्तुंची विक्री करणारे छोटे व्यावसायिक या ठिकाणी आवर्जून या आठवडे बाजारास हजेरी लावतील. भरत सोनवणे. सरपंच, न्हावी १५
राष्ट्रीय सहकार विकास विभाग (NCDC) च्या सहकार्याने या बाजारासाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असुन
आठवडा बाजार हा ग्रामीण स्वयंपूर्णतेचा आणि सहकार तत्वाचा एक उत्तम उदाहरण ठरणार आहे. तसेच भविष्यामध्ये मंडईसाठी निधी मिळेल, या आठवडे बाजारामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीस चालना मिळू शकेल.
भालचंद्र जगताप. संचालक,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक
न्हावी ३२२, न्हावी १५, हिंगे वाठार, भोंगवली, पेंजळवाडी, टापरेवाडी, भांबवडे, गुणंद, सावदरे, राजापुर, पांडे तसेच वीर धरण भागातील शेतकऱ्यांना या बाजाराचा फायदा होईल, आज पहिल्यांदाच बाजार भरला असला तरी ग्राहकांची संख्या लक्षणीय होती, येणाऱ्या पुढील काळात नागरिक भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येतील, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
येणाऱ्या सणांमुळे घरातील खरेदीसाठी नागरिक प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे. नागरिकांना बाहेगावाहून जास्त दराने भाजीपाला किंवा अन्य पदार्थ खरेदी करावे लागत होते, ते आता या बाजारात स्वस्त दरात खरेदी करता येईल. याचा फायदा ग्राहक व व्यापारी दोघांनाही होणार आहे, हा बाजार सुरु झाल्यामुळे परिसरातील छोटे व्यावसायिक तसेच भाजी-पाला विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी राजगड सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक दत्तात्रय चव्हाण, माजी संचालक रवी चव्हाण, न्हावी FPO चेअरमन नवनाथ सोनवणे, न्हावी विकास सोसायटी चेअरमन अंकुश चव्हाण, भोर तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्यासह परिसरातील बचत गटाच्या महिला भगिनी, शेतकरी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




