इंद्रायणी नदीमध्ये 20 वर्षीय महिला पोलीस शिपायाची उडी मारुन आत्महत्या
आनंद शेलार, खेड तालुका.
आळंदी : दि. 25/08/2024 (रविवार) महिला पोलीस शिपाई अनुष्का सुहास केदार वय 20 वर्षे, रा.लक्ष्मीनारायण नगर, दिघी. यांनी इंद्रायणी नदीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. अद्याप त्याचा मृतदेह सापडला नसुन त्यांचा युध्दपातळीवर शोध चालु आहे.
अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या त्या सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीस होत्या, त्यांनी रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली, अनुष्का केदार यांना नदीत शोधण्याचे काम सुरू आहे, मात्र मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे शोधकार्यात अडचणी येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमा नरके यांनी दिली.
त्यांनी उडी घेताच त्याठिकाणी उपस्थित असलेल्या एका तरुणाने देखील त्यांना वाचवण्यासाठी उडी घेतली. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अनुष्का वाहून गेल्या अशी माहिती प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या स्थानिकांनी दिली आहे. अनुष्का यांचा अग्निशमन दल शोध घेत आहेत, अनुष्का यांनी त्यांच्या खासगी जीवनातील वैयक्तिक कारणामुळेच असं टोकाचं पाऊल उचलल्याची भीती पोलिसांकडून वर्तवली जात आहे. याबाबत अधिकचा तपास आळंदी पोलीस अधिकारी करत आहेत.




