हरिश्चंद्री येथील उड्डाणपुलाचे रखडलेले बांधकाम 2 ऑक्टोबरच्या मुहूर्तावर सुरू होणार
कापूरहोळ : दि. 23 ऑगस्ट 2024 हरिश्चंद्री ता.भोर,जि. पुणे. येथील पुणे-बेंगलोर हायवेच्या उड्डाणपुलाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे नागरिकांची वर्दळ आणि संभाव्य धोके लक्षात घेता उड्डाणपुलाचे रखडलेले बांधकाम ताबडतोब पूर्ण करावे या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी महामार्ग व केंद्रीय परिवहन मंत्रालयाला दिले होते.
पुणे महामार्गावर हरिश्चंद्री गावच्या हद्दीतील महामार्ग मृत्यूचा सापळा ठरला आहे. या ठिकाणी अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील हरिश्चंद्री फाट्यावर अखेर उड्डाणपुलाच्या कामाला 2 ऑक्टोंबर 2024 रोजी सुरुवात होणार असल्याचे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पश्चिम महाराष्ट्राचे अधिकारी संजय कदम व कॉन्ट्रॅक्टर निखिल कंतट्रक्शन यांनी हरिश्चंद्री ग्रामस्थांना दिले आहे.
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग हा हरिश्चंद्री गावाच्या मधून गेल्यामुळे दळणवळणसाठी मोठी अडचण झाली होती. रस्त्यावरून शेतीच्या मशागतीच्या कामासाठी अलीकडे पलीकडे जाणे येणे, शेती मशागत करण्यासाठी लागणारी औजारे महामार्गाच्या पलीकडील बाजूला नेणे, गुरांना चाऱ्यासाठी रस्त्यापलीकडे जाणेसुधा अवघड झाले आहे. गावातील नागरिकांना बाजारपेठेत जाणे लहान मूलांना शाळेत जाण्यासाठी महामार्गावरूनच जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे.
हरिश्चंद्री गावातील 7 ते 8 नागरिकांचा या ठिकाणी अपघात होऊन त्यांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. या गोष्टींना कंटाळून हरिश्चंद्री ग्रामस्थांनी गेली 8 ते 9 वर्षे आंदोलनाचा पवित्रा घेत उपोषण, शोले स्टाईल पाणी टाकीवर आंदोलन, रास्ता रोको, आत्मदहन अशी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याने हरिश्चंद्री ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
त्याच बरोबर हरिश्चंद्री ग्रामस्थांनी याआधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना ब्रीज व्यतिरिक्त ज्या मागण्या केल्या होत्या त्या जर मागण्या 2 ऑक्टोंबर पर्यंत पूर्ण नाही केल्या तर हरिश्चंद्री ग्रामस्थ पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे ग्रामस्थांनी सोशल मीडियाशी बोलताना सांगितले.
अखेर हरिश्चंद्री गावाच्या उड्डाणपुलाला 2 ऑक्टोंबर 2024 रोजी सुरूवात होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.




