हिंदु नववर्षाच्या स्वागत यात्रेनिमित्त आयोजित दुचाकी रॅली उत्साहात संपन्न ; कापूरहोळ पंचक्रोशीमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत
कापूरहोळ : हिंदु नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने ३० मार्च रोजी सकाळी ९ वाजता मोठ्या उत्साहात दुचाकी रॅली काढण्यात आली होती,या रॅलीने संपूर्ण कापूरहोळ पंचक्रोशीमध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण केले. बाईकस्वारांनी घोषणांच्या जयघोषात आणि भगवे झेंडे फडकवत नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये उत्साह निर्माण केला.
विर धाराऊमाता स्मारक येथून या दुचाकी रॅलीला प्रारंभ झाला. यामध्ये शंभूतिर्थ कापूरहोळ, सम्राटनगर, विश्वास कॉलनी,गावठाण कापूरहोळ, गावठाण व हरे हरेश्वर मंदिर हरिश्चंद्री, ट्राफिक पोलीस चौकी कापूरहोळ, भोर फाटा, बालाजी चौक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर व देऊळजाई माता मंदीर दिवळे, पुन्हा कापूरहोळ येथील अमृता कॉलनीतुन राजगड कारखाना, महागणपती मंदीर निगडे, अडबलनाथ मंदिर धांगवडी व गावठाण, किकवी असा विविध मार्गाहून प्रवास करुन सारोळा याठिकाणी या भव्यदिव्य रॅलीचा समारोप करण्यात आला.
या रॅलीच्या समारोप प्रसंगी युवकांना मार्गदर्शन करताना नागेश तनपुरे यांनी राष्ट्रीय चरित्र हे राष्ट्र निर्माण कार्यातील महत्त्वाचे अंग असून आपल्या जीवनात त्याचा अवलंब केला तर लवकरच वैभव संपन्न भारत मातेचे स्वप्न सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
या बाईक रॅलीत अंदाजे १२५ ते १५० बाईकस्वारांनी सहभाग घेतलेला दिसुन आला. विशेष म्हणजे काही गावांमध्ये डोक्यावर भगवे फेटे परिधान करून महिला व युवतीं मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या दिसून आल्या. दुचाकीस्वारांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “गणपती बाप्पा मोरया”, “प्रभू रामचंद्र की जय” अशा जयघोषात उत्साह निर्माण केला होता.
रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष सागर गाडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे जिल्हा कार्यवाहक संतोष गाडे या मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजापाठ करून हिंदू नववर्षाची गुढी उभारून दुचाकी रॅलीस सुरूवात करण्यात आली. दुचाकीस्वारांनी मार्गावरील नागरिकांना हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या शुभेच्छा दिल्या व सहभागी होण्याचे आवाहन केले असता शेकडो नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
हिंदू नववर्ष व गुढीपाडवा तसेच दुचाकी रॅली यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गाडे, जनसेवा बँक मॅनेजर दत्तात्रय गाडे, प्रवीण तनपुरे, गजानन गाडे,ओंकार ओंबळे, सोमनाथ कुलकर्णी, प्रदीप पाचकाळे, विनोद चौधरी, दिपक लेकावळे, रवींद्र पांगारे, संकेत गुरव या सर्व कार्यकर्त्यांनी पथक परिश्रम घेतले, दुचाकी रॅलीमुळे संपूर्ण कापूरहोळ पंचक्रोशीमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.




