नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरणाऱ्या चेलाडी ते राजगड रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण करणार : संतोषआप्पा दसवडकर
नसरापूर : चेलाडी ते राजगड (वेल्हा) हा जीवनवाहिनी मानला जाणारा रस्ता आज अक्षरशा मृत्यूचा सापळा ठरत असून रस्त्यावर सर्वत्र खोल खड्डे पडल्याने नागरिक, शालेय विद्यार्थी, कामगार, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व पर्यटक यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांत या मार्गावर झालेल्या भीषण पघातांमध्ये अनेक तरुणांचा बळी गेला असून, अनेकजण अपंगत्वाला सामोरे गेले आहेत. शासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) याकडे मात्र कानाडोळा केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी मार्गासनी येथे खड्डयात अडकून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शासनाच्या बेफिकीरीचे ठळक उदाहरण आहे. हा रस्ता म्हणजे शासन व PWD च्या निष्काळजीपणाचे प्रतीक आहे, नागरिक मरत आहेत, अपघात वाढत आहेत, पण जबाबदार राजकीय मंडळी गप्प बसली आहेत असा संताप मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोषआप्पा दसवडकर यांनी व्यक्त केला.
या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून येत्या रविवारी, दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ‘खड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन’ करण्यात येणार आहे. शासनाचे लक्ष वेधून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी हा अनोखा मार्ग अवलंबण्यात येत आहे.
हा लढा नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे. शासनाला जागे करण्यासाठी व नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी या आंदोलनाला उपस्थित राहून आपली ताकद दाखवावी,” असे आवाहन जिल्हाध्यक्ष दसवडकर यांनी केले आहे.
यावेळी संतोषआप्या दसवडकर (जिल्हा अध्यक्ष मनसे), विलास बापू बोरगे, (जिल्हा अध्यक्ष सहकार),दिगंबर चोरघे (राजगड ता. अध्यक्ष), धनंजय टेमघरे (मुळशी ता. अध्यक्ष), शशिकांत वाघ (भोर शहर अध्यक्ष), मिथुन चोरघे (अध्यक्ष राजगड ता. कामगार सेना), संतोष चोरघे (अध्यक्ष राजगड ता. सहकार सेना), संग्राम दसवडकर (अध्यक्ष राजगड ता. युवा सेना), अशोक चोरघे (सरपंच वांगणी), संतोष चोरघे, पांडुरंग पिलाने हे मान्यवर उपस्थित होते.




