ताज्या घडामोडी

अतिवृष्टीचा आणखी एक बळी ! पुराच्या पाण्यात 70 वर्षीय शेतकरी बेपत्ता !! पान्हवळ परिसरात शोककळा


भोर : भोर तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पान्हवळ (ता. भोर) येथे एक दुर्दैवी घटना घडली. शेतातील परिस्थिती पाहण्यासाठी गेलेले शेतकरी आनंदा गणपत (मारुती) कोंढाळकर (वय 70) हे अंबवडे ओढ्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. खरिपातील भातपिकाची रोपे पाण्याखाली गेली आहेत का तसेच शेतातील पाण्याचा पंप सुरक्षित आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी आनंदा कोंढाळकर बुधवारी शेताकडे गेले होते. यावेळी शेताच्या बांधावरून जात असताना चिखलामुळे त्यांचा पाय घसरला आणि ते थेट अंबवडे ओढ्यात कोसळले.

Advertisement

ओढ्याला मोठा पूर आल्याने ते क्षणात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांच्यासोबत असलेले चुलत भाऊ सुरेश दिनकर कोंढाळकर यांनी त्यांना वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. तसेच आरडाओरडा करून ग्रामस्थांना मदतीसाठी बोलावले. मात्र वेगवान प्रवाहामुळे त्यांना वाचविणे शक्य झाले नाही.

घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी चार ते पाच तास शोधमोहीम राबविली. मात्र वृत्त लिहिपर्यंत आनंदा कोंढाळकर यांचा शोध लागलेला नव्हता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा संग्राम थोपटे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू असून नागरिकांनी पूरग्रस्त नदी, नाले व ओढ्यांमध्ये जाण्याचे धाडस करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!