छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकाविरुद्ध राजेशिर्के घराणे आक्रमक ; दिग्दर्शकावर 100 कोटी रुपयाचा दावा ठोकणार
पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांमध्ये प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत असुन विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या छावा या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. रोज हा चित्रपट नवनवीन रेकॉर्ड बनवत आहे.
अशातच चित्रपटातील काही दृश्यांवर राजे शिर्के घराण्याच्या वारसांनी आक्षेप घेतला आहे, या चित्रपटात राजे शिर्के घराण्याला दोषी दाखवण्यात आले असल्याचा आरोप कुटुंबीय करत आहेत, सोमवार दि 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता पानशेत खोरे व धरण परिसरातील शिर्के घराण्याचे वंशज शिरकोली गावात एकत्र येणार आहे. शिरकाई देवी मंदिरात सर्व कुटुंबीय एकत्र येवून छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांचा विरोधातील रस्त्यावरील आणि न्यायालीयन लढाई उद्यापासूनच सुरु करणार आहेत.
कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना राजे शिर्के घराण्याला चित्रपटच्या माध्यमातुन दोषी ठरवून बदनाम केल्याचा आरोप शिर्के यांच्या वारसांनी केला आहे. त्यामुळे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर त्यांच्यावर 100 कोटी रुपयांचा दावा ठोकणार असुन छावा कादंबरीच्या प्रकाशकाच्या विरोधात रस्त्यावरील व न्यायालय लढा सुरू करणार आहेत.




