एक गाव, एक गणपती ! कापूरहोळ गावची ७२ वर्षाची परंपरा
कापूरहोळ : भोर तालुक्यातील ऐतिहासिक कापूरहोळ या गावातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या दुधाई वीर धाराऊ माता गाडे यांच्या वंशजांनी पहिल्यांदा १९५३ मध्ये गावातील जाणकार मंडळींच्या माध्यमातून ” एक गाव, एक गणपतीची ” संकल्पना मांडण्यात आली आणि त्याच वर्षी गावातील विठ्ठल मंदिरामध्ये गणपती बाप्पांना विराजमान करत गणेश उत्सव साजरा करायला सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव हा केवळ उत्सव नसून तो श्रद्धा, संस्कृती आणि एकात्मतेचा खऱ्या अर्थानचे स्वरूप आहे. ह्या उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व खूप मोठे असुन गणेश उत्सवाचे घरगुती पूजेचे भव्य सार्वजनिक कार्यक्रमामध्ये रुपांतर झाले. म्हणून गणेश उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणणारी सामाजिक आणि सांस्कृतिक घटना आहे. आणि ह्याच धार्मिक उत्सवाला सामाजिक स्वरूप देण्याचं आदर्शवत कार्य कापूरहोळ गावचे ग्रामस्थ,तरुणमंडळ व महिला भगिनीनी चालु ठेवले आहे.
गेली ७२ वर्षापासून कापूरहोळ गावातील सर्व ग्रामस्थ व तरुण मंडळ एकत्र येत सार्वजनिक गणेश उत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला यासह सर्व सण आनंदाने साजरे करत असतात, गणपती उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व आध्यात्मिक परिवाराची शिकवण आहे हाच आदर्श ह्या गावाने जोपासला आहे. संपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येत सर्व उत्सव साजरे करतात. विशेष म्हणजे गावातील तरुण एकत्र येवून सजावट, आरास तयार करत असतात. येथे बनविण्यात येणारा देखावा पर्यावरणपूरक असतो. या वर्षी देखील पर्यावरणपूरक देखावा तयार केला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संदीप गाडे यांनी दिली.
वीर धाराऊ माता मंडळांच्या गणेश उत्सवाचे स्वरूप पाहता ” एक गाव एक गणपती ” या उत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण गाव एकत्रित यावा, गावात एकोपा नांदावा म्हणून खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण गावातील आबालवृद्ध, महिला भगिनीं, युवावर्ग, ग्रामस्थ मंडळी एकत्र येत आपले सर्व मतभेद बाजूला ठेऊन अगदी गुण्यागोविंदाने ह्या उत्सवात सहभागी होत असतात. खास करून ह्या गावाने जपलेला हा एकात्मतेचा वारसा खऱ्या अर्थाने पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात आदर्शवत असाच आहे.
साधारणपणे २४०० लोकसंख्या असलेल्या या गावातील ‘एक गाव, एक गणपती’ उत्सवाचे यंदाचे ७२ वे वर्ष आहे. कापूरहोळ गावात साजरा करण्यात येणाऱ्या गणेश उत्सवाला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मंडळीं, सोबतच शासकीय क्षेत्रातील, पोलीस विभागातील उच्चपदस्थ अधिकारी वर्ग दर वर्षी आवर्जून आपली उपस्थिती दर्शवित असतात अशी माहिती गावचे सरपंच पंकज गाडे यांनी दिली.




