छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेला रायरेश्वर किल्ला पर्यटकांची ठरतोय पहिली पसंती
भोर : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली पावनभुमी असलेल्या, ऐतिहासिक वारसा लाभलेला, स्वराज्याची साक्ष असलेला रायरेश्वर किल्ला पाहण्यासाठी शिवभक्त व पर्यटकांचा कल वाढत आहे.
स्वराज्याची शपथ घेतलेले शिवमंदिर. सात रंगाची माती, पांडवकालीन लेणी, पाण्याचे गोमुखकुंड, विलोभनीय असा सूर्योदय आणि सूर्यास्त, अस्वलखिंड (नाकिंदा), भुयारी मार्ग अशी सुप्रसिध्द ठिकाणांना शिवप्रेमी, पर्यटक भेटी देतात. दाटझाडी, खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे. सदर रायरेश्वर पठार वर्षाऋतूत पाहण्यासारखा असतो. पावसाळा सुरू झाला की रायरेश्वर पठारावर डोंगर उतारांवर छोटी छोटी रानफुले फुलायला लागतात. विविध जातींच्या, रंगांच्या, आकारांच्या या फुलांची जणू काही एक बहारदार चादरच सह्याद्रीच्या कडेपठारांनी ओढलेली असते. काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंतचे आयुष्य असणाऱ्या या फुलांचे एक समृद्ध भांडारच ऑक्टोबर अखेर पर्यंत कमी-अधिक प्रमाणात एकदाच फुलते, कवळा, रानहळद, गोकर्ण, काटेसावर, पिवळा धोत्रा, तेरडा, जांभळी मंजिरी, सोनतारा, घाणेरी, ऑर्किड, दाहण ही रानफुले मन मोहून घेतात. अशा या रायरेश्वर किल्ल्यावरून दिसणारे मनमोहक दृष्य असते.
अवघ्या 16 व्या वर्षी शिवरायांनी घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ.वयाच्या 44 व्या वर्षांपर्यंत अखंड 28 वर्षे केलेल्या अथक परिश्रमातून साकारले गेलेला, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांच्याकरवी चंद्रसूर्य असेपर्यंत चिरकाल टिकणारे स्वराज्य वृंदावन करून ते श्रीरायरेश्वर जवळ स्थापित केले,संपूर्ण एकाच दगडात कोरलेले चारी बाजूंनी पंच पाकळ्या व वर शिवलिंग असे या स्वराज्य वृंदावनाचे स्वरूप आहे.
रायरेश्वराहुन एकाच नजरेत दिसणारे किल्ले तोरणा, राजगड , सिंहगड, पुरंदर, रोहिडा, कमळगड, केंजळगड, पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हेश्वर, लिंगाणा, रुद्रमाळ, चंद्रगड तसेच देवधर धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच येत असतात. पावसाळ्यात उंच डोंगरावरून पडणारे धबधबे पडतात एका ठिकाणी तर वाऱ्याच्या प्रेशरने धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह उलट्या दिशेने खालून वरती जातो हे पाहण्यासाठी आणि फुलांचा बहर आला की मोठ्या प्रमाणात पर्यटक अधिकच गर्दी करीत असतात.
रायरेश्वर येथील धबधबे व शंभू महादेवाचे पवित्र मंदिर परिसर निसर्ग सौंदर्य श्रावणा निमित्त रायरेश्वराच्या दर्शनासह निसर्गाच्या आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक या दृष्टीने या परिसरातील विकास होण्याची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली असून स्थानिकांना नव्या रोजगाराची संधी निर्माण होऊ शकतात.आशा अनेक मुद्द्यांकडे प्रशासनाचे लक्ष समीर घोडेकर यांनी वेधले आहे.




