भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांना उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार ! लोकाभिमुख कामगिरीची दखल
भोर : भोर तालुक्यात सर्वाधिक पानंद रस्ते खुले करणे तसेच कातकरी समाजातील नागरिकांना आधारकार्ड व जातीचे दाखले मिळवून देण्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांना ‘उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. पुणे येथील थेऊर फाटा परिसरात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.
महसूल विभागात गेल्या वर्षभरात उत्कृष्ट, लोकाभिमुख व परिणामकारक कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. भोर तालुक्यात तहसीलदार नजन यांनी २०५ पानंद रस्ते खुले करून ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना दिली. तसेच कातकरी समाजातील ३६५ नागरिकांना आधारकार्ड व जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबवून त्यांना शासकीय योजनांच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
याशिवाय ई-पीक पाहणी, महसूल वसुली, जनगणना, मतदान विभाग, महाराजस्व अभियान, फार्मर आयडी नोंदणी तसेच नोंदणीकृत सातबारा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. यावेळी आमदार माउली कटके, उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, यशवंत माने व महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते.




