आई-भावाच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचं अपहरण ! लग्न चार दिवसांवर ! भिगवण बंदची हाक
भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे धक्कादायक घटना घडली, २१ वर्षीय तरुणी, तिची आई व भाऊ दुचाकीवरून लग्नाच्या खरेदीसाठी जात असताना दोन तरुणांनी तिच्या आई-भावाच्या डोळ्यात चटणी टाकून तरुणीचं अपहरण केलं. आरोपींचं घर तरुणीच्या शेजारीच असून, दोघांमध्ये मागील काही महिनाभरापासून फोनवर बोलणं होतं. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ संतापलेल्या गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन केलं. पुणे-सोलापूर महामार्ग काही काळ रोखून धरला गेला, परंतु सध्या वाहतूक सुरळीत आहे. आरोपींना तात्काळ अटक व तरुणीची सुटका व्हावी, यासाठी भिगवण बंदची हाक देण्यात आली होती, हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन असून, आमदार गोपीचंद पडळकर व संग्राम जगताप सहभागी होणार आहेत.
पोलिसांनी आरोपी व तरुणीच्या शोधासाठी सहा विशेष पथकं रवाना केली आहेत, १६५ किमीचा रूटमॅप तयार करून सीसीटीव्ही, कॉल डिटेल्स तपासल्या जात आहेत. मात्र, अद्याप तरुणी सापडली नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे.
धक्कादायक म्हणजे, तरुणीचं लग्न २२ फेब्रुवारीला म्हणजे अवघ्या चार दिवसांत आहे. पोलिसांनी धार्मिक तणाव टाळा, मोर्चे काढू नका असं आवाहन केलं असून, उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करू, असा इशारा दिला.




