श्री क्षेत्र नारायणपूर येथे गुरुपौर्णिमानिमित्त भाविकांची अलोट गर्दी
चंद्रकांत शितोळे,
सासवड.
सासवड : गुरुपौर्णिमेनिमित्त दि.१० जुलै (गुरुवार) रोजी श्रीक्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथील एकमुखी व तीनमुखी श्रीदत्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.गुरू आणि शिष्य यांच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे गुरू पौर्णिमा असल्याने या सणाचे अनन्यसाधारण महत्व आहे. या सणानिमित्त शिष्यांच्या वतीने गुरूना शुभेच्छा आणि भेटवस्तू देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात येत असते. गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण दर्शन घेण्यासाठी आले होते.
गुरू पौर्णिमेनिमित्त नारायणपूर येथील दत्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. येथे दर्शन घेण्यासाठी पहाटे पासूनच भाविकांच्या रांगा लागल्या दिसत होत्या. मंदिरामध्ये पहाटे ४:३० वाजल्यापासून पूजा पाठ चालू होते. मंदिराला फुलांची केलेली आकर्षक सजावट लक्ष वेधून घेत होती. भाविकांची मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.
दुपारी १२ वाजल्यापासून भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केलेली होती. मंदिरामध्ये शेवटची आरती रात्री १०:३० वाजता झाली. मंदिरामध्ये दिवसभर प्रसाद वाटप करण्यात आले होते. नारायण महाराजांनी भारतामध्ये बांधलेले चारधाम त्या ठिकाणाहून ट्रस्टी व भक्तगण आले होते.येथे सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झालेली होती.




