करंदी खेब्यात ‘जलक्रांती’चा चमत्कार ! अनेक वर्षांचा पाणीप्रश्न सुटून गाव टँकरमुक्त !! महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबली
नसरापूर : भोर तालुक्यातील मौजे करंदी खेबा येथे जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेमुळे गावाचा अनेक वर्षांपासूनचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला असून गाव टँकरमुक्त झाले आहे. या योजनेमुळे ग्रामस्थांसह विशेषतः महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे–सातारा महामार्गापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या करंदी खेबा गावासाठी जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र, योजनेतील सुमारे ३०० मीटर पाईपलाईन वन विभागाच्या हद्दीतून जात असल्याने आवश्यक परवानग्यांअभावी काम तब्बल दोन वर्षे रखडले होते. परिणामी गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता.
दरम्यान, देवडी येथील पाझर तलावातील पाझर विहिरीतून १३०० मीटर लांबीच्या दाब नलिकेद्वारे करंदी खेबा गावातील विहिरीपर्यंत पाणी यशस्वीरीत्या पोहोचविण्यात आले. चाचणी यशस्वी झाल्यानंतर गावात नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे टँकरची गरज पूर्णपणे संपुष्टात आली असून शासनाचा खर्चही वाचणार आहे.
सरपंच नवनाथ गायकवाड, उपसरपंच कोमल गायकवाड, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच प्रशासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही योजना प्रत्यक्षात साकार झाली. जल जीवन मिशनच्या माध्यमातून सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या उद्दिष्टाला करंदी खेबा येथे यशस्वी स्वरूप प्राप्त झाले असून ही योजना परिसरातील इतर गावांसाठीही पेरणादायी ठरत आहे.




