तोरणा किल्ला पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांची कार पाबे घाटात १५० फूट खोल दरीत कोसळली ! झाडामुळे तिघांना जीवदान !! मागून आलेल्या पर्यटकांनी दोरीच्या साहाय्याने केले बचावकार्य
राजगड : तोरणा किल्ला पाहण्यासाठी निघालेल्या तिघांच्या कारला राजगड तालुक्यातील पाबे घाटात भीषण अपघात झाला. चढावावर अचानक बंद पडलेली कार पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरून मागे घसरत सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, दरीतील झाडाला कार अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात तिघे जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर येथील तिघे जण कारने तोरणा किल्ल्याकडे निघाले होते. पाबे घाटातून प्रवास करताना चढावावर अचानक कार बंद पडली. त्याचवेळी पाऊस आणि रस्त्यावरील ओलाव्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले. कार मागे घसरत थेट खोल दरीत कोसळली.
सुमारे १५० फूट खाली गेल्यानंतर कार एका झाडाला अडकल्याने तिचा पुढील प्रवास थांबला आणि तिघांचे प्राण वाचले. अपघातानंतर मागून येणाऱ्या पर्यटकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. दोरीच्या साहाय्याने कारमध्ये अडकलेल्या तिघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने वेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, झाडामुळे तिघांना जीवदान मिळाल्याने परिसरात सुटकेचा निःश्वास सोडण्यात आला.




