पुणे सातारा हायवेवर सारोळा येथे दुचाकीच्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी.
सारोळा : पुणे-सातारा महामार्गावर सारोळा ता.भोर जि.पुणे. गावच्या हद्दीत ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी (दि. २० जून) सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. शंकर बाप्पुसो निकम (वय २४ वर्ष, रा. विद्यानगर, सांगली) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-सातारा महामार्गावर पुण्याच्या दिशेने दुचाकी नंबर एम. एच. १० डी. ई. १४५४ वरून जात असणाऱ्या तरुणाला मागून येणाऱ्या ट्रकने (के. ए. २५ ए. बी. ६०८४) सारोळा गावच्या हद्दीत धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार शंकर निकम हा तरुण गंभीर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस ठाण्याचे पोलीस अंमलदार नाना मदने व मयूर निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली वा उपचारासाठी तात्काळ दाखल केले. तसेच महामार्गावर अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.




