ताज्या घडामोडी

किकवी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना मिळाले व्यासपीठ ! पणती सजावट, रांगोळी नक्षीकामासह विविध कलाप्रकारांचे प्रात्यक्षिक !! विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाली नवी दिशा


सारोळा : किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी येथे दिवाळी सणाचे औचित्य साधून इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध कलाकौशल्य कार्यशाळा उत्साहात पार पडली. मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कलात्मक अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यात आले.

कार्यशाळेत पणती सजावट, डोअरमॅट सजावट, मॅटवरील रांगोळी नक्षीकाम तसेच कापडावरील आकर्षक नक्षीकाम या कलाप्रकारांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. उपशिक्षिका सौ. दीप्ती वीरम आणि उपशिक्षक रामचंद्र धानवले यांनी विद्यार्थ्यांना विविध कलांचे तंत्र समजावून सांगत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेचा वापर करून सुंदर कलाकृती साकारल्या. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Advertisement

विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पकता, कलात्मक दृष्टिकोन आणि हस्तकौशल्य विकसित करणे, तसेच सणांच्या माध्यमातून पारंपरिक कलांचे जतन करणे, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यालयात शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक विनोद राऊत यांनी मार्गदर्शक शिक्षक व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संस्थाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, उपाध्यक्ष प्रशांत कोंढाळकर, सचिव राजेंद्र भोसले आणि संचालक मंडळानेही या उपक्रमाचे अभिनंदन केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!