ताज्या घडामोडी

महाराष्ट्राने एक अनुभवी, कर्तृत्ववान आणि विकासाभिमुख नेता गमावला : चंद्रकांत बाठे


भोर : कामाचा माणूस म्हणुन जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अनुभवी, कर्तृत्ववान आणि विकासाभिमुख नेता गमावला असल्याची भावना माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी व्यक्त केली आहे.

अजितदादा पवार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. कामाप्रती प्रचंड निष्ठा असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. राज्यातील विविध विकासकामांच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

चंद्रकांत बाठे यांनी म्हटले आहे की, भोर तालुक्याशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादा पवार यांच्यासोबत जवळून काम करण्याची संधी मिळाल्याचे भाग्य लाभले, नेता म्हणून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या सहवासातून राजकारणातील अनेक बारकावे शिकता आले, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

सर्वसामान्य कुटुंबातील अनेक कार्यकर्त्यांना घडवून मोठे करण्याचे काम अजितदादा पवार यांनी केले. स्पष्ट वक्ता, निर्भिड आणि रोखठोक भूमिका हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. “जे पोटात तेच ओठावर” ही त्यांची ओळख होती.

राज्यातील अनेक शहरांवर अजितदादा पवार यांचे विशेष प्रेम होते. नियोजनबद्ध विकासाच्या माध्यमातून त्यांनी शहरांना वेगळ्या उंचीवर नेले. शहराचा सर्वांगीण विकास करताना त्यांनी जागतिक पातळीवर शहराची ओळख निर्माण करण्यासाठी मोठे योगदान दिले.

अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे भोर तालुका पोरका झाला असून पुणे जिल्ह्यासह राज्याचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या दुःखात सर्व भोर तालुका सहभागी आहे, अशा भावनिक शब्दांत चंद्रकांत बाठे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!