ग्रामपंचायत निवडणुका २०२६ लांबणीवर ! ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय !! राज्यातील १४ हजार २३७ गावांवर प्रशासक बसणार
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गोंधळ कायम असताना ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत निवडणुका २०२६ लांबविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत कार्यकाळ संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींवर थेट प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे किमान सहा महिने निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.
हा निर्णय जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला असून, १४ ऑगस्ट २०२० च्या शासन निर्णयानुसार प्रशासकांची नियुक्ती होईल. ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी हे आदेश काढले असून, कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार सुरळीत चालवण्यासाठी हा उपाय महत्त्वाचा ठरेल.
विभागनिहाय प्रभावित ग्रामपंचायतींची संख्या पाहता, छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक ४१३४, पुणे विभागात २८७०, नाशिक विभागात २४७६, अमरावती विभागात २४५१, नागपूर विभागात १५०८ आणि कोकण विभागात ७९८ ग्रामपंचायती प्रभावित होणार आहेत. एकूण १४ हजार २३७ ग्रामपंचायतींवर प्रशासक बसणार आहेत.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना ब्रेक लागला आहे. स्थानिक पातळीवर निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ग्रामस्थांमध्येही असमाधान पसरले असून, प्रशासनावर कारभाराची पूर्ण जबाबदारी येईल. आता निवडणुका कधी होणार, याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. पुढील महिन्यांत सरकारकडून अंतिम निर्णय अपेक्षित आहे.




