ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलची वारकरी दिंडी उत्साहात ! भक्ती, संस्कृतीचा संगम !! विठ्ठलनामाने कापूरहोळ परिसर दुमदुमला
कापूरहोळ : आषाढी वारीचे औचित्य साधत ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल किकवी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली विद्यार्थी वारकरी दिंडी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी संत परंपरेची ओळख करून देत तिचे सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक महत्त्व पटवून देण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. उमेश सोनावले, उपप्राचार्य श्री. हेमंत दहिवले, समन्वयिका किशोरी खुटवड तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. प्राची काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
वारकरी दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून विठ्ठल-रखुमाईच्या भक्तीचा जागर केला. मृदुंगाच्या तालावर भजन, अभंग, गवळणी आणि नामसंकीर्तन सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “पांडुरंग हरी”च्या जयघोषाने किकवी गावातील परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, सामाजिक जाणीव, शिस्त, सामूहिकताचे महत्त्व रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. भक्ती, संस्कार आणि सामाजिक मूल्यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा वारकरी दिंडी सोहळा सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. उपस्थित पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे विशेष स्वागत करत शाळेच्या प्रयत्नांचे कौतुक केले.




