मॉडेल स्कूल प्रकल्पांतर्गत शाळांची पाहणी ! डिजिटल सुविधा, सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर : तृप्ती खुटवड
कापूरहोळ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘मॉडेल स्कूल (आदर्श शाळा)’ प्रकल्पाला गती देण्यासाठी पंचायत समिती सदस्या तृप्ती विक्रम खुटवड यांनी शनिवारी कामथडी, माजगाव-लव्हेरी आणि गणेशनगर येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधत शाळांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पाहणीदरम्यान शाळांच्या इमारतींची स्थिती, वर्गखोल्यांचे आधुनिकीकरण, डिजिटल शिक्षणासाठी उपलब्ध सुविधा, विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी आवश्यक मैदान, सुरक्षिततेच्या उपाययोजना तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी आणि शौचालयांच्या सुविधांचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आवश्यक असलेल्या भौतिक आणि तांत्रिक सुविधांवर विशेष भर देण्यात आला.
ग्रामस्थांनी यावेळी शाळांच्या दुरुस्तीची आवश्यकता, तांत्रिक साधनसामग्रीची उपलब्धता, परिसराचे सुशोभीकरण, विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा आणि डिजिटल साधनांच्या वाढीबाबत विविध सूचना मांडल्या. काही ठिकाणी शाळांच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणीही करण्यात आली.
ग्रामस्थांच्या सूचना आणि अपेक्षा सकारात्मकपणे ऐकून घेत तृप्ती खुटवड यांनी संबंधित प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच शाळांचा सर्वांगीण विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास साधणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणेच आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावावा आणि विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक क्षमता विकसित व्हावी, हा मॉडेल स्कूल प्रकल्पाचा प्रमुख उद्देश असल्याचे तृप्ती खुटवड यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या या पाहणीमुळे संबंधित गावांतील शाळांच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.




