शेतकऱ्याला गोठ्यात घुसून लाठ्या-काठ्यांनी, पाईपाने बेदम मारहाण ! राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नसरापूर : भोर तालुक्यातील करंदी खेबा येथे जुन्या वादाच्या रागातून शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून दोघांनी केलेली बेदम मारहाणीने गावकऱ्यांमध्ये संतापाची लहर उसळली आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात पुणे येथील आरोपी आकाश राजू शिंदे व त्याच्यासोबतच्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, दोघांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन दत्तात्रय खाटपे (३४, रा. करंदी खेबा, ता. भोर) हे शेती व दुग्धव्यवसाय करतात. दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या जनावरांच्या गोठ्यात ही घटना घडली. गावातील भांडणाचा राग धरून आरोपी आकाश शिंदे (रा. उत्तमनगर, पुणे) व अनोळखी इसम गोठ्यात घुसले. त्यांनी हाताने, लाथाबुक्यांनी तसेच लाकडी दांडक्याने व प्लास्टिकच्या पाईपने सचिन यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सचिन जखमी झाले असून, त्यांनी राजगड पोलिसांकडे फिर्याद दिली.
या घटनेमुळे करंदी खेबा गावात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, आरोपींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रकाराबाबत न्याय मागितला असून, पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.




