भोरच्या योगसाधकांनी घडविला सेवाभावाचा विक्रम ! आषाढीवारीतील सेवा ठरली विक्रमी !! योग विद्या धामच्या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
भोर : आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेल्या ‘वारकरी मसाज सेवा’ या अभिनव उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद झाल्याने योग विद्या धाम भोर व योग विद्या धाम देहूच्या सेवकांचा विशेष सन्मान करण्यात आला. योगाला वैज्ञानिक अधिष्ठान देणारे योगमहर्षी डॉ. कुवलयानंद स्वामी यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त गंगूताई पंतसचिव वाचनालय, भोर येथे आयोजित कार्यक्रमात हा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
दि. ११ जुलै २०२६ रोजी आषाढी वारीदरम्यान योग विद्या धाम पिंपरी-चिंचवड यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात योग विद्या धाम भोर आणि देहू येथील साधकांनी हजारो वारकऱ्यांना मसाज सेवा देत त्यांच्या पायी प्रवासातील थकवा दूर करण्याचे कार्य केले. या आगळ्यावेगळ्या सेवाकार्याची दखल घेत वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाने त्याची अधिकृत नोंद केली असून सहभागी सेवकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योग विद्या धाम भोरचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. विनया पुंडे व ह.भ.प. राजेंद्र महाराज शास्त्री उपस्थित होते. राजेंद्र महाराज शास्त्री यांनी योग आणि अध्यात्म यांचे महत्त्व विशद केले, तर डॉ. पुंडे यांनी योगमहर्षी डॉ. कुवलयानंद यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला.
यावेळी संस्थापिका योग पंडित अनुराधाताई देवी, योग पंडित निर्मला किंद्रे, डॉ. आनंदा कंक, योगेश शेडगे, सागर शेटे, यशवंत भिलारे, रुपाली भेलके, सुनिता लगड यांच्यासह अनेक योगसाधक उपस्थित होते. सागर शेटे यांनी योगगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता लगड यांनी केले, तर योगेश शेडगे यांनी आभार प्रदर्शन केले.




