मोहरीत अमृतेश्वर यात्रेचा भव्य कावड सोहळा ! हजारो भाविकांचा उपस्थितीत पार पडला
कापूरहोळ : भोर तालुक्यातील गुंजन मावळ खोऱ्याचे आराध्य दैवत श्री अमृतेश्वर यात्रेनिमित्त मोहरी ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य धार्मिक सप्ताह साजरा झाला. १७ मार्चला सुरू झालेल्या या अडीच दिवसांच्या उत्सवाने गाव भक्ती-श्रद्धेने न्हाऊन निघाले. पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी झाले. कीर्तन, प्रवचन, भजन, हरिपाठ यांनी भक्तिमय वातावरण साकारले. लहान-मोठे सर्वजण उत्स्फूर्त सहभागी झाले.
यावेळी पारंपरिक दिंडी मिरवणूक टाळ-मृदुंगाच्या गजरात काढली. फाल्गुन अमावस्येला रात्री १० वाजता पालखी मिरवणूक ढोल-ताशांच्या निनादात पहाटे ४ पर्यंत रंगली. सकाळी मंदिरात भव्य आरती झाली. गुढी पाडव्याला भाविकांनी गुंजवणी नदीचे पवित्र जल कावडीत भरून मंदिराला अर्पण केले.
तसेच या उत्साह दरम्यान ढोल-ताशांच्या जयघोष, ढोल-लेझीम, लोकनाट्य, तमाशा, नामांकित पैलवानांनी कुस्त्याच्या जंगी आखाड्यात रोमांचक लढती झाल्या. धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक उत्सव आणि सामाजिक एकोप्याचा अनोखा संगम पाहायला मिळाला.




